तिसरे महायुद्ध की थानोस ची चुटकी ?
मी शाळेत असताना इतिहासाचे शिक्षक आम्हाला खूप आवडायचे,कारण ते खूप चांगले शिकवायचे. पहिले महायुद्ध, दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास शिकवताना आम्हा विद्यार्थ्यांना त्या जगात घेऊन जायचे. त्यामुळे हे युद्ध आपल्यासमोरच होतय की काय, असेच आम्हाला वाटायचे. त्यांचे एक वाक्य मला अजूनही चांगले आठवते ते म्हणजे, "दुसऱ्या महायुद्धाची कारणे ही पहिल्या महायुद्धाच्या तहात होती." स्वार्थी राज्यकर्त्यांच्या सत्तालोलुप, अतिमहत्त्वाकांक्षी, हुकूमशाही आणि आत्मकेंद्रीत प्रवृत्तीमुळे दुसरे महायुद्ध झाले होते.मग आम्ही मुले बाल उत्सुकतेपोटी सरांना विचारायचो की, "सर, समजा तिसरे महायुद्ध झालेच तर मग..?" त्यावेळी सर सुद्धा गमतीने म्हणायचे की ज्याप्रमाणे जगाने पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाचा वणवा पाहिला, त्याप्रमाणे तिसरे महायुद्ध हे सुद्धा स्वार्थी राज्यकर्त्यांच्या जीवघेण्या सत्तास्पर्धेमुळे आणि अतिमहत्त्वाकांक्षेमुळे होईल व यामुळे सगळे जग प्रत्यक्षपणे अथवा अप्रत्यक्षपणे भरडले जाईल.आज अर्थातच सर्व जग हे कोरोना सदृश तिसरे महायुद्ध हे याची देहा याची डोळा पहात आहे. ज्या सूक्ष्म जीवापासून मानवाची उत्पत्ती झाली, त्याच प्रकारचा सूक्ष्मजीव आज संपूर्ण मानव जातीला व मानवाच्या अस्तित्वाला आव्हान देताना दिसत आहे, आणि कदाचित त्याच प्रकारच्या सूक्ष्मजीवांमुळे मानव प्रजातीचा अंत होणार की काय?.
या उद्रेकामुळे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. अजूनही माणूस यावर रामबाण उपाय शोधतोय. कालांतराने यथावकाश हा उद्रेक सरल्यानंतर अनेक कॉन्स्पिरसी थेअरीज जन्माला येतील, काही जण म्हणतील आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाचा भाग आहे... नुसतेच आखाडे, अंदाज आणि शक्यता वगैरे वगैरे...पहिल्या व दुसऱ्या महायुद्धातील प्रचंड विध्वंस अनुभवलेले हे जग बंदुकीची एकही गोळी न झाडता तिसऱ्या महायुद्धाचा मूक साक्षीदार झालेले आहे. हे युद्धाची रचना भयंकर विचित्र आहे, कारण येथे प्रतिहल्याला वावच नाही. हे युद्ध कोणते राष्ट्र जिंकेल हे येणारा काळच सांगू शकतो. (जीवघेणा विषाणू निर्माण करणारा देश(?) की त्या विषाणू संसर्गाच्या उद्रेकाला थोपवणारा देश..).
(Image Source : Google Images)
ज्याप्रमाणे हॉलीवुड मधील मार्वल स्टुडिओज या चित्रपट निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध कंपनीने जगाला अनेक लोकप्रिय असे सुपरहिरो दिले आहेत. त्यांच्या चित्रपटामध्ये जेंव्हा जेंव्हा जगावर संकट येते तेंव्हा तेंव्हा या सुपरहिरोंनी जगाला विनाशापासून वाचवले आहे. भले तो आयर्न मॅन असूदे, स्पायडरमॅन असूदे, थोर, हल्क....! त्याचप्रमाणे मार्वल ने त्यांच्या अवेंजर्स या लोकप्रिय चित्रपट शृंखलेतील इन्फिनिटी वॉर आणि एंडगेम या हॉलिवूडपटांमधे एक क्रूर निर्दयी सुपरव्हिलन सुद्धा दिला आहे तो म्हणजे थानोस. ज्याचे ध्येय म्हणजे त्याला मिळालेल्या अनंतमणी (इन्फिनिटी स्टोन्स) पासून विश्वातील सजीव सृष्टीचा नायनाट करून विश्वामध्ये एक समतोल, बॅलन्स, इक्विलिब्रियम साधणे. यासाठी थानोस साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गांचा वापर करून ते अनंतमणी मिळवतोच व ते धारण करतो आणि त्याक्षणी त्याला फक्त एक चुटकी वाजवणे आवश्यक असते.. तो चुटकी वाजवतो का नाही हे तुम्ही प्रत्यक्ष चित्रपट बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल... आज थानोस रुपी कोरोना नावाचा सुपरव्हिलन मानवाला आव्हान देत आहे. अनेक निष्पाप माणसांच्या झुंडीच्या झुंडी तो गिळंकृत करतो आहे. संपूर्ण जग आज स्तब्ध आणि निशब्द झालेले आहे. या राक्षसाच्या विनाशासाठी आपणाला कोणताच सुपरहिरो वाचवायला येणार नाही कारण जे काही करायचे आहे ते आपल्याला आणि फक्त आपल्यालाच करायचे आहे. पण मैदानावर येऊन नव्हे तर फक्त शांतपणे आप-आपल्या घरात बसून व शासनाच्या निर्णयाचे व नियमांचे पालन करून.
त्याचप्रमाणे जे लोक कोरोनाशी लढा देत आहेत, रोज मृत्यू समोर दिसत असूनही सिंहाच्या काळजाने त्याला सामोरे जाणारे देवदूत म्हणजेच डॉक्टर्स, नर्सेस, तसेच आरोग्य कर्मचारी, समांतर वैद्यकीय सेवेत असणारे कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना आणि पोलीस कर्मचारी या सर्वांसाठी आपण निश्चितपणे आपल्या प्रार्थनेतून कृतज्ञता ही व्यक्तच केली पाहिजे.
यथावकाश हे जगण्यासाठीचे, आपल्या अस्तित्वासाठीचे चालू असलेले वैश्विक युद्ध समाप्त होईल व थानोसरुपी कोरोनाला चुटकी वाजवायची वेळ न देता आपण त्याचा नक्कीच नायनाट करू व आपणच आपल्याला वाचवू.. आणि यासाठी कोणत्याही सुपरहिरो ची गरज नाही ,कारण आपल्या सर्वांमध्ये कुठेतरी एक सुपरहिरो दडलेला असतो असे मला वाटते.
इम्रान तांबोळी
वारणानगर, कोल्हापूर
Salute to all Corona Warriors. And yes we will finally win..
ReplyDeleteWe will definitely come out of this pandemic soon. You have presented very good content sir. Liked it so much.
ReplyDeleteGreat Message Sir
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteहे सर्व नक्कीच संपेल...
ReplyDeleteअर्थात आपण जिंकणारच 💪.
शब्द नाहीत coronavirus लढवाय्यांबद्दल... Hats off🧢 to them